आम्ही लऊळकर
आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
← आठवणी
✍️ इतर

आठवणीतले 'सोन्याबापू'... आणि हरवलेला गोवंश!

आठवणीतले 'सोन्याबापू'... आणि हरवलेला गोवंश!
पाच-साडेपाच फूट उंचीचं ते रांगडं व्यक्तिमत्त्व! अंगात तीन गुंड्यांचा मळकट पांढरा सदरा, डोक्यावर पांढरी टोपी, नेसायला धोतर आणि पायात अगदी किलोभर वजनाची बांधीव चांभारी चप्पल. खांद्यावर वावभर लांब चामड्याच्या वादीचा हासूड असायचा. दाढी नेहमी खरडून केलेली, ज्यात कुठेतरी पांढरे खुंट डोकावायचे; पण मिशा मात्र पांढऱ्या, झुपकेदार आणि आकड्याच्या! मिशांतून चहा सोरपून पिण्याची बापूंची एक खास स्टाईल होती. जनावरे राखायला जाताना बुटक्या घोडीवर बसलेले सोन्याबापू अतिशय रुबाबदार दिसायचे. त्या काळी आमच्या 'लऊळ' गावात बापूंना ओळखत नाही, असा माणूस शोधूनही सापडला नसता. गावातली जनावरे दिवसभर कुर्मदासच्या माळावर चरायला घेऊन जाणे, हा बापूंचा नित्यक्रम. या कामासाठी त्यांना महिन्याला जेमतेम पाच-दहा रुपये मिळायचे. दररोज सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान बापू गावातल्या प्रत्येक घरी जाऊन जनावरे सोडवून आणायचे आणि वेशीबाहेरच्या मुस्लिम मसनवाट्यामध्ये जमा करायचे. तिथून हा सगळा गोतावळा कुर्मदासच्या माळाकडे मार्गस्थ व्हायचा. एखादी नवीन गाय राखणीला आली, तर ती पळून जाऊ नये म्हणून दाव्याच्या तुकड्याने तिला जुन्या गायीच्या म्होरकीला बांधलं जायचं आणि जास्तच वांड गाय असेल, तर तिला थेट 'पायकुट' घातला जायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा पोरांचा अड्डा मसनवाट्यातच असायचा, तोही केवळ सोन्याबापूंची वाट बघण्यासाठी! बापू लांब गेलेल्या गायींची वळती करून आले की, जनावरे माळाकडे नेताना आम्हाला त्यांच्या घोडीवर बसवून सतीच्या मैदानापर्यंत किंवा कधी चिमट्यापर्यंत घेऊन जायचे. तिथे उतरून बापू पुढे जायचे आणि आम्ही मजेत माघारी गावात यायचो; त्यात एक वेगळाच आनंद असायचा. सकाळी जनावरे मसनवाट्यात गोळा झाली आणि निघायची वेळ झाली की, बापू त्यांच्या शिवलेल्या खिशातील बनेलीतून हळूच दोन रुपये काढायचे आणि तेल्याच्या पायरीकडे असलेल्या टपरीवर पाठवायचे. जाताना सांगायचे, “त्यांना सांगा, दोन रुपयाची तुमची आठ घरं करा... आणि येताना राती काय आला ते विचारून या.” टपरीवाला ते दोन रुपये घेऊन एक छोटी चिठ्ठी द्यायचा. ती 'मटक्याची चिठ्ठी' असायची, हे आम्हाला जरा मोठे झाल्यावर समजले. त्याकाळी गावातल्या जवळपास प्रत्येक घरात, विशेषतः कोष्टी समाजात एक तरी देशी गाय असायचीच. सकाळी प्रत्येकाच्या दारात जाऊन गाय घेऊन जाणे आणि संध्याकाळी बरोबर सहा वाजता आणून सोडणे, हा बापूंचा अलिखित नियम. महिन्याकाठी राखणावळ मागायला बापू घरी आले की, त्यांना चहा पाजल्याशिवाय कोणीही परत पाठवत नसे; इतका जिव्हाळा या माणसाने कमावला होता. काळ पुढे सरकला... सोन्याबापू वयानुसार थकत गेले आणि त्यांच्यासोबतच गावातला तो देशी गोवंशही कधी लुप्त झाला, हे आमचं आम्हालाच समजलं नाही. आज सोन्याबापू कुणा-कुणाच्या आठवणीत आहेत? ९० च्या दशकातील सर्वांना सोन्याबापू नक्कीच आठवतील! 🌾 ©️ san2
✍️ संतोष गवळी
9 ऑगस्ट 2026
📤 ही आठवण शेअर करा
WhatsApp वर शेअर करा ← सर्व आठवणी
✍️
तुमचीही एखादी आठवण आहे?

लऊळशी जोडलेली कोणतीही आठवण इतरांसोबत शेअर करा.

आठवण लिहा →